स्वामी प. पू. केवल सुहृतीर्थ यांचे संक्षिप्त जीवनचरित्र
स्वामी प. पू. केवल सुहृतीर्थ (पूर्वाश्रमीचे श्री. सदाशिव गोविंद लेले) यांचे जीवनचरित्र थोडक्यात लिहिण्याचा हा प्रयत्न आहे. वास्तविक सद्गुरूंचा महिमा वर्णन करण्यास कोण समर्थ आहे? पण बरीच वर्षे लोटून गेल्यावर आतां त्यांचे समग्र अध्यात्मिक लेखन टप्प्या-टप्प्याने जनांपुढे प्रकाशित होत आहे. तेव्हां वाचकांना — ही कोण विभूती होऊन गेली? त्यांचे प्रत्यक्ष जीवन कसे गेले असेल? त्यांचा जीवनकाल कोणता? इत्यादि प्रश्न मनांत उपस्थित होणार! व त्याची यथाशक्ती परिपूर्ती करणेही क्रमप्राप्त आहे. तेव्हां सद्गुरूंस मनोमय नमन करून हे कर्तव्यकर्म सुरू करीत आहे.
प. पू. केवल सुहृतीर्थ स्वामी यांचा जन्म बडोदे (गुजरात) येथे वैशाख वद्य ४ शके १८३२ दिनांक १७-५-१९११ रोजी सुसंस्कारी, आचारनिष्ठ पण गरीब घराण्यांत झाला. अगदी लहान वयांतच काळाने मातृछत्र हिरावून नेले, त्यामुळे हत मनोरथ व जीवनांतील आस्थाच संपलेल्या वडिलांना आधार देत व एक लहान भाऊ व बहीण यांच्यासाठी त्यांच्या आईची जागा भरून काढून त्यांचा सांभाळ करण्याच्या भूमिकेत प्रवेश केला. त्यामुळें लहान वयांतच प्रौढ व परिपक्व मनोबैठक तयार झाली.
पूर्वजन्माचे ईश्वरनिष्ठेचे संस्कार असल्याने, जी काय परिस्थिती आहे ती ईश्वराचेच इच्छेने आहे हा सिद्धान्त उपजतच स्वीकारलेला होता. व प्राप्त परिस्थितीत अंगावर आलेली कर्तव्ये ईश्वरावरील पूर्ण निष्ठेने पार पाडली गेली. त्यावेळच्या खडतर परिस्थितीत कित्येक वेळां सार्वजनिक बागांतील नळाचे पाणी पिऊन निर्वाह केला गेला, असा उल्लेख त्यांच्याच लेखनांत आढळतो. पण कुठेहि मानहानीकारक याचना करणे नाही. उपजतच कुशाग्र बुद्धी, असाधारण एकाग्रता सिद्धी मिळालेली! त्यामुळें बहुढंगी व चतुरस व्यक्तिमत्त्व. उत्तम चित्रकला, शिल्पकला, उत्तम पाककला अवगत!
आयुर्वेदाचे सखोल ज्ञान. जे कोणी संपर्कात येतील त्यांच्याबद्दल जन्मसिद्ध सहजतेने सुहृदभावच जागृत होत असल्याने संपर्कातील सर्वांच्या हृदयांत अगदी अंतर्भागांत स्थान मिळालेले, अशी काही त्यांची लौकिकार्थाने वैशिष्ट्ये सांगता येतील. पण हे सर्व त्यांच्या मनोबैठकीचा सहज प्रतिसाद म्हणता येईल. खरा मूळ अंतर्गत गाभा तर अवधूत पदाचाच, ज्याचे वर्णन आचार्यांनी केल्याप्रमाणे —
मौने मौनी गुणिनि गुणवान् पंडिते पंडितश्च ।
दीने दीनः सुखिनि सुखवान् भोगिनि प्राप्तभोगः ।
मूर्खे मूर्खो युवतिषु युवा वाग्मिनि प्रौढवाग्मी ।
धन्यः कोऽपि त्रिभुवनजयी योऽवधूतेऽवधूतः ॥
असा असल्याने त्यांचा प्रतिसाद साहजिकच वरीलप्रमाणे येत असे. याबाबत त्यांच्या व्याही घराण्यांत (बहिणीचे सासरीं) एका लग्नप्रसंगी घडून गेलेला प्रसंग सांगण्यासारखा आहे. त्या घरातील कोण्या एका मुलीचे लग्नप्रसंगी मुलीस मामा नव्हते. तेव्हां, “हिला बोहल्यावर घेऊन जायचे कोणी?” यावर चर्चा सुरू झाली. त्यांत यांचे नाव पुढें आले! त्यावर “असे कसे?” असे विचारताच घरांतील एका प्रौढ महिलेने उद्गार काढले, “तुम्ही सर्वांनाच सर्व नात्यांनी शोभून दिसाल असेच आहांत.” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली. असे अनेक प्रसंग सांगता येतील. एकंदरीत सांसारिक भूमिकेत असतांना ती पूर्ण दक्षतेने पार पाडली.
एकूण जीवनातील सुमारें अर्धा कालखंड अशा रीतीने ईश्वरदत्त कर्तव्यकर्मांत पूर्तीत गेल्यावर खऱ्या देवाच्या व देवाला वाहिलेल्या विभूतीच्या पुढच्या कालखंडात काय असेल? बहुतेक सर्व संतांच्या बाबतींत दिसते तसेंच! लौकिक अर्थाने उपजीवनाच्या मार्गे लागण्याची तयारी नाही! त्याबाबत बेफिकिरी! त्यामुळें कुठेहि नोकरी करणार नाही हा ठाम निश्चय. त्यापायी घरांत व बाहेर असा अंतर्बाह्य विरोध झेलला. कारण एकदा आपण “देवाचे” झाल्यानंतर त्याला सर्व काळजी आहेच हा अढळ सिद्धान्त व त्याबरोबर व्यापारी आपणावर लादून येऊ नये ही तळमळ! अशी तळमळ त्यांचे “उपासना” भागामध्ये जागोजागी दिसते. एक तत्त्व एकदां आपल्या जीवनांत सिद्धान्त म्हणून स्वीकारल्यावर त्याचा आपल्या जीवनांत प्रयोग करून त्याचा कस लावणे व तो सिद्धान्त जगणे, असे उदाहरण हल्लींच्या दिवसांत क्वचितच आढळेल.
पुढें व्यापारी बडोदे, पाटण, कोरळ, अंमळनेर (पूर्व खानदेश), लढोद, पातलपूर, धारोळी अशी शहरे-खेड्यांतून बरीच भटकंती झाली. त्यांच्या बोलण्यात एक विधान बरेच वेळां येत असे — “कोणतीहि गोष्ट असो, आपल्या मनांत जर दृढ संकल्प असेल की ‘हे अमुक’ मला हवे आहे. हे हवेंच आहे आणि दुसरें कांहींहि नको — तर तसा योग परम कृपाळू ईश्वर जरूर जमवून आणतोच!”
कोणत्याहि क्षेत्रांत दिगंत कीर्ती मिळविलेल्या कोणाचेंहि उदाहरण पहावें, याचा पडताळा मिळतोच ना! असो.
अशा रीतीने ईश्वरनिष्ठेचे सिद्धान्त जगत असतांना त्यांचे अंतर्वचेचे पडसाद विविध प्रकारें उमटले व ते वेळोवेळीं चित्तवेधक शीर्षकांसह कागदावर उमटले ते म्हणजेच आज उपलब्ध असलेले त्यांचे वाङ्मय. त्यांत कोठें भक्तिरसाचा आविष्कार आहे, त्याच्या अत्युच्च कोटीमुळे वाचक अक्षरशः विरघळून जातो व मनाची अवस्था वर्णन करण्यास शब्द सांपडत नाहींत. कोठें तत्त्व सिद्धान्तात्मक विवरण आहे. तेव्हां त्यांचे प्रकांड पांडित्य व गूढात् गूढतम विषय उकलून सांगण्याची विलक्षण हातोटी बघून वाचक विस्मयचकित होतो. ओघाने कोठें निसर्गवर्णने आली आहेत, त्यांचा हृदयंगम आविष्कार व भव्यता अनुभवून परम आल्हाद वाटतो, तर कोणा जिवलगाशी जीवांचे हितगूज चालले ते वाचून मन प्रेमाने भरून येते. आविष्कार कसलाही असो. त्यामधील शब्दप्रचुरता अत्युच्च कोटीची!
तत्त्वज्ञान विषयांत त्यांचे अखेरच्या कालखंडातील लेखन प्रायः दोनच विषयांभोवती फिरत असलेले आढळते. “काम” आणि “मृत्यू”! त्यांतील उकलून दाखविलेली गूढ तत्त्वे वाचून तर वाचक अक्षरशः अवाक् होतो.
संत वाङ्मय पुष्कळच मोठे आहे व प्राचीन ग्रंथांचे अधिकारी भाष्यकारही खूप आहेत. ते सर्व आपापल्या परीने आपापले महत्त्व राखून आहेत. पण हे जे आविष्काराचे एक “स्व-तंत्र” आहे तसें दुसरीकडे सहसा कुठे आढळून येत नाही. अशा महापुरुषाचे चरित्र लेखन करतांना त्यांच्या लौकिक जीवनांतील व्यक्ती, घटना, अनुभव यांना महत्त्व देऊ नये, असे आम्हांस वाटते. त्यामुळें त्यावर जास्त लक्ष केंद्रित न करता त्यांच्या आध्यात्मिक प्रवासावर प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रिय वाचकांनी गोड मानून घ्यावा.
अशा रीतीने सिद्धान्त जगलेल्या व्यक्तीचा अंतकाळही कसा झाला असेल? त्या काळात आपल्या भक्तांना व जिव्हाळ्याच्या व्यक्तींना ते नेहमी म्हणत दाखवीत, “मरता गुरु आणि रडता चेला या दोन्हींचेही जन्म वायां गेलेले होत.” त्यामुळें अतःपर भाबडा व अडाणी भाव धरून कोणी भेटण्यास येऊं नये. पत्रव्यवहार करू नये, केल्यास उत्तरे दिली जाणार नाहीत. त्या दिवसात म्हणत, “वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी जीवन समाप्ती करणें नाही.”
जन्म वैशाख वद्य ४ शके १८३२ चा तर स्वेच्छा मरणी असल्याने वैशाख वद्य ५ शके १८८९ या दिवशी प्राप्त देह विसर्जन केले तेही कसें?
त्यांच्याच एका लिखाणांत आलेल्या वर्णनाप्रमाणे, “एखाद्या धिप्पाड गजराजाच्या गळ्यांत पुष्पमाला असावी व कांहीं निमित्ताने ती गळून पडावी व ते त्याच्या लक्षांतहि येऊं नये,” तितक्या हळुवारपणे त्यांचा पंचमहाभूतात्मक देह स्थिरावला.
अशा या महापुरुषाचे लौकिक जीवन तर होऊन गेले. कित्येक वर्षे गेली. तरीही पण त्यांचे वाङ्मय तर पूर्ण रसरशीतपणे अजूनही आहे. तेंच तर त्यांचे खरे जीवन. अक्षर ब्रह्मरूप पूर्ण जीवन! तें आजहि आमच्या भाग्याने आमचे समीप आहे. एरव्ही सामान्य मूढ अज्ञानी जीव या भ्रमरूप संसारसागरात सुखदुःखांच्या लाटांबरोबर अनादी काळापासून वहातच आहेत. कधी कुणाचा पूर्वसुकृताने व महान भाग्याने अशा महापुरुषांशी संपर्क येतो. ज्याचा खरा लाभ कोणी करून घेतला तर त्या जीवास उदयास येऊन त्यांचे आमूलाग्र परिवर्तन होईल. अशी सफलता वाचकांस, प्रिय मुमुक्षु-साधक वाचकांस मिळो हीच त्या जगन्नियंत्या ईश्वराचे चरणीं विनम्र प्रार्थना!
या लेखनाच्या वाचकांस कांहीं विनम्र सूचनावजा प्रार्थना करावीशी वाटते —
लेखनाची भाषाशैली कांहींशी जुन्या वळणाची, संतकालीन किंवा त्याहूनहि प्राचीन वाटते. पण त्यामुळें मनामध्ये उगीचच अवघडता न आणतां थोडी चिकाटी धरून वाचन चालूंच ठेवल्यास लवकरच त्याचा सराव होतो.
दुसरें, लेखनातील तत्त्वज्ञान विवरणात्मक भागांमध्ये कोणास तें दुर्बोध, समजण्यास अवघड, डोईजड वाटण्याचा संभव आहे. पण त्याबद्दल चिंता न करतां वाचन चालूंच ठेवावे. कारण समर्थ पुरुषांच्या केवळ वाणींतच गूढात् गूढ तत्त्वांचा प्रकाश पाडण्याचे सामर्थ्य असते, असा जाणत्यांनी मान्य केलेला सिद्धान्त आहे. तेव्हां त्याशी अनुसंधान चालूंच ठेवल्यास जीवाच्या नकळत अगदी अंतर्भागात त्याविषयक बांधणी चालूच राहते. याबाबत त्यांच्याच लिखाणातील काही उतारे उद्धृत केल्याविना रहावत नाही.
(“आत्ममंथन मनोमंथन” मधून)
“हे लिहिलेलं वाचायला आणि समजायला सारें अवघड आहे ना? पण खरें तर तसं नसावें — कां? कुंभाराला गाडगी घडवितांना कधी पाहिलं आहे काय? जात्याच्या तळीसारखें फिरतें एक आडवें चाक बसविलेलें असतें. त्यांत काठी घालून कुंभार त्यास प्रथम रूप वेग देत असतो. त्या चाकाच्या मध्यभागीं लिवलिवीत मातीचा एक मोठा गोळा ठेवलेला असतो. तोहि त्या मातीचा एक मोठा गोळा चक्रावर फिरता होता, आणि मग कुंभार चाकाबरोबर हळूहळू चक्रभर फिरता होता. आणि मग कुंभार काय करतो? ज्याप्रकारचें भांडें घडणें असेल त्याप्रमाणें त्या गोळ्याला तो आपले हात आंतून-बाहेरून देत असतो आणि भांडें घडले जातें. हे असेंच शब्दांचें पण आहे. शब्दांनी घडवून घ्यावयाचें नसतें. शब्दांनी घडत जात असतें.
प्रारब्धाच्या चक्रगतीचा वेग आपोआप असतोच. त्या वेगांत जो शब्द येईल त्या शब्दासरशी घडण आपोआप घडली जात असतेच. “वचनात्प्रवृत्तिर्वचनान्निवृत्तिः।”
सगळे कांहीं शब्दांनी आपोआपच घडत असतें. राष्ट्रीय प्रवृत्ती, धर्म प्रवृत्ती या नित्याच्या चळवळी काय असतात? शब्दच. तिरस्कार-द्वेष वगैरेचे प्रेरक व उद्दीपक काय असतात? शब्दच. त्या सर्वांतून निवृत्त करवून शांतिला स्थापनारे काय असतात? शब्दच. रोजचा अनुभव आहे हा.
खरादी म्हणजे लाकडाचे घाट घडविणारे सुतारहि आपलें लाकूड फिरत्या चाकावर धरूनच त्याचे घाट घडवितात. पण त्यांत मूळ लाकडाचा पुष्कळसा चुरा व धस असतो. मूळ लाकडांतून पुष्कळसे लाकूड घटून जाऊन मगच तो इष्ट घाट घडला जात असतो. म्हणून तो दृष्टांत येथे साजत नाहीं. मातीचा तसा ऱ्हास होत नाहीं, मूळ मातीची जी घट होत जाते ती त्या घाटांतच. लांकडासारखी वाया जाणारी घट त्यांत मुळींच नसते.
प्रारब्धाच्या चक्रगतीचा एक वेग आपोआप असतोच. त्या वेगांत जो शब्द येईल त्या शब्दासरशी घडण आपोआप घडली जात असते. त्यांत घट म्हणजे तूट कांहींहि नसते. त्यांत जी घट ती तयार घाटच.”
हातीं घेतलेले लेखन कांहीं तरी भारदस्त व विशेष बुद्धिपूर्वक वाचून त्यांतून उक्त बोध ग्रहण करून तो स्थिर स्थितीनें वर्तता करावयाचा आहे अशा वृत्तीने लेखन हाती घेतल्यानेच ते वाचण्यास व समजण्यास अवघड वाटतें. पण सहजासहजी एक गंमत म्हणून, मौज म्हणून, आनंदाचा व हौशीचा एक खेळ म्हणून, कौतुकाच्या, हांसऱ्या व बागडत्या वृत्तींनी जर तें हातीं घेऊन वाचले गेलें तर तें अवघड मुळींच वाटत नाही. उलट अतिशय रसाळ व सोपें वाटतें, आणि उक्त घाट इतक्या सहजासहजी घडला जात असतो कीं तो केव्हां व कसा तें कळलेलें देखील नसतें.
स्वतःशीच ईश्वरी स्वरूप ओळखविणारें परंपरेनें चालत आलेले शब्द कुंभाराच्या प्रक्रियेचे असतात. खराद्याच्या प्रक्रियेचे नव्हेत.
“नव्हे पिंडज्ञाने। नव्हे तत्त्वज्ञाने। समाधान कांहीं नव्हे तानमानें॥
नव्हे योगाभ्यासें नव्हे भोग-त्यागें। कारण त्या सर्व खराद्याच्या प्रक्रिया होत।
पण — समाधान तें सज्जनाचेनि योगें॥”
कारण ती प्रक्रिया कुंभाराची. कुंभाराचें काम सगळें लिवलिवीत मातीच्या गोळ्याशी. प्रारब्ध चक्रावर फिरत्या मातीच्या गोळ्याशी. तासातास व घासाघास तेथें कांहीं नसतें. टोकदार व खोंचदार हत्यारांचा कारभार तेथें कांहीं नाही. सोनार लोहारासारखी पिटापीट व ठोकाठोक तेथें कांहीं नाही. आग नाही, रसरस नाही. ओल्या सैल व सहज हातांच्या सहजगती. मनमोकळेपणाचा व्यवहार व मनमोकळेपणाचें समाधान. म्हणून मनमोकळेपणानेच त्यांचे शब्द हाताळावयाचे असतात. हाताळून घ्यावयाचे असतात. वाचण्यात गोडी आहे, सुख व नकळतच इष्ट घाटाची अचूक घडण आहे. कारण, “उदासीनता तत्त्वतां सार आहे.”
तत्त्वतः आलेली उदासीनता, शून्य वृत्तित्व. जीवन व जगत् यांच्या तात्त्विक विवरणाने व विवेचनाने वृत्तीचे ठिकाणीं आपोआपच शून्यत्व बाणत जातें. प्रत्यक्षच दिसूं लागतें. मग काय आहे? कांहीं सांडावें लागत नाहीं, कांहीं मांडावें लागत नाहीं. कांहीं टाकावें लागत नाहीं, कांहीं पत्करावें लागत नाहीं. तत्त्वतः उदासीनता आपोआप व न कळतच आहे. आणि आत्मबोधरूप, स्वरूपसाक्षात्काररूप सारें सार त्या उदासीनतेशींच सिद्ध आहे.
म्हणून उदासीनता हेंच सर्वसार व सत्य सफलता आहे. म्हणून “सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहें.” मोकळी म्हणजे — “कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि” — नित्य घडणाऱ्या क्रियांशीं किंवा क्रियांनी परिणामाला कोणत्याहि प्रकारे स्वार्थ-परार्थ परतेची जाणीवहित अपकारी-उपकारीपणाच्या जाणीवहित. “अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।।” व अशा मोकळ्या वृत्तीनें कांहींहि वांचणें, ऐकणें, स्मरणं तें केवळ सुखरूपच होय.”
एका समर्थ पुरुषाचें हें आपणास आश्वासनच नव्हें काय?
मर्मज्ञ वाचकांसाठी इतके पुरेसे आहे — इति अलम्।
ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सहवीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु । मा विद्विषावहै ॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
— जयंत अभ्यंकर.
Comments
Post a Comment